Ideas

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 225 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


मुरूमगाव धानोरा:
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन मुरूमगाव व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 16, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मुरूमगाव येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील 225 शाळकरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन मुरूमगावचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेंग, पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16, कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक पवार साहेब, अशी लाकोले, तसेच इतर सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका खेवले मॅडम, इतर शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खेमराज खोब्रागडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणले, त्यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. पोलीस प्रशासन केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांद्वारे समाजाच्या विकासासाठी सदैव कार्यरत आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन मुरूमगाव व राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 16, कोल्हापूर यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments