पोटेगाव रोडवरील अस्वच्छतेवर आक्रमक हस्तक्षेप
गडचिरोली : नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या पावलावर पाऊल ठेवत गडचिरोली शहराला अस्वच्छतेच्या विखळ्यातून बाहेर काढून सुजलाम-सुफलाम बनवण्याचा ठाम निर्धार नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या या भूमिकेचा प्रत्यय पोटेगाव रोड येथील गंभीर प्रकरणात पुन्हा एकदा दिसून आला.
गडचिरोली शहरालगत असलेल्या पोटेगाव रोड परिसरात नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातून संकलित करण्यात आलेला कचरा सर्रासपणे उघड्यावर टाकण्यात येत होता. यामुळे त्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हवेमार्गे हा कचरा व दुर्गंधी आसपासच्या वस्तीपर्यंत पोहोचत असल्याने लहान मुले, वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
विशेष म्हणजे, याच मार्गावरून पोलीस भरतीसाठी सराव करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी सकाळ व संध्याकाळच्या सत्रात प्रॅक्टिससाठी येतात . याशिवाय शहरातील नागरिक मॉर्निंग वॉक, सायंकाळी फिरण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. अशा ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर प्रकार असल्याचे चित्र समोर आले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी वेळ न दवडता घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थिती पाहून त्यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझ्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.”
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना तात्काळ कचरा उचलण्याचे, संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याचे तसेच भविष्यात अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकला जाणार नाही यासाठी कठोर व कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे संकेतही यावेळी देण्यात आले.
या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी पिंदुरकर, जे. ई. खामनकर तसेच सफाई कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या थेट हस्तक्षेपानंतर तत्काळ स्वच्छता मोहिमेला गती मिळाल्याचे चित्र दिसून आले.
नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या या आक्रमक, ठाम आणि नागरिककेंद्रित भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, “गडचिरोली आता केवळ स्वच्छतेच्या घोषणा करणारे शहर राहिले नसून, प्रत्यक्ष कठोर अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.


0 Comments