Ideas

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रद्द करू नका : आरमोरीत माकपचे तीव्र निदर्शने


देशव्यापी आंदोलनात शेतमजूर संघटनांचा सहभाग

आरमोरी: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी देशभरात तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून गडचिरोली जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने आरमोरी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
सन २००५ मध्ये केंद्र सरकारने मनरेगा कायदा लागू करून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाकाठी किमान १०० दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्याची कायदेशीर हमी दिली होती. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे डाव्या पक्षांच्या खासदारांचा निर्णायक दबाव होता. काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली होती.
या कायद्यामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर, भूमिहीन कामगार आणि गरीब कुटुंबांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली व स्थलांतरालाही आळा बसला होता. मात्र २०१४ नंतर सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुरुवातीपासूनच या कायद्याबाबत विरोधी भूमिका घेतली होती. अखेर हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील शेतमजुरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कामगार वर्षभरात कधीही काम मागू शकतात, परंतु नवे विधेयक केवळ नाव बदलने नाही तर ते संपूर्ण मनरेगा मजुराची कामे संपवणारी विधेयक आहे या विधेयकात 40% बजेट कपातील ची तरतूद आहे. म्हणजे पहिल्याच टप्प्यात 40 टक्के रोजगार हमी बंद करण्याचा डाव आहे.आज कुठल्याच राज्याची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या मजबूत राहिलेली नाही, म्हणून कोणतेच राज्य रोजगार हमीसाठी भरीव मदत करू शकणार नाही,असे मजूर वर्गाचे आकलन आहे.
याच पार्श्वभूमीवर शेतमजूर युनियनच्या वतीने देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले. आरमोरी येथील आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅम्रेड अमोल मारकवार यांनी केले. आंदोलनात कॉम्रेड अर्चना मारकवार यांच्यासह लिलाधर मेश्राम, मुनेश्वरी मारोती खरकाटे, मुरलीधर सखारामजी दोनाडकर, रेवता मुरलीधर दोनाडकर, नानाजी कान्ह धोटे, मिना चंद्रशेखर तितीरमारे, सुलोचना दसरथ तितीरमारे, गिता मुर्लीधर भोयर, भावना रत्नाकर भोयर, अर्चना राजेंद्र अतकरे, राजेंद्र दादाजी अतकरे, नरेश फाल्गुन दोनाडकर, नलुताई नरेश दोनाडकर, कल्पना शामराव नन्नावरे, पसंता कालीदास ‌माने, शंकर वंगण मेश्राम, सुमन पुंडलिक दहिकर, गिता दिपाजी दोनाडकर, दिपाजी नामदेव दोनाडकर इत्यादी   शेतमजूर, कष्टकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी आंदोलकांनी
“मनरेगा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या,”
“ग्रामीण रोजगारावर घाला नको,”
अशा जोरदार घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला.
मनरेगा कायदा रद्द झाल्यास ग्रामीण भागातील कोट्यवधी शेतमजूर बेरोजगार होतील, दारिद्र्य वाढेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कॉम्रेड अमोल मारकवार  यांनी दिला.

Post a Comment

0 Comments