गडचिरोली: मुख्यमंत्री श्रमुद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी मौजा मौशिखांब येथे ग्राम पंचायत मौशिखांब व प्राथमिक आरोग्य केंद्र अमीर्झा यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत कार्ड काढणे व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत मौशिखांबच्या सभागृहात मोठ्या उत्साहात व लोकसहभागातून करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे आयोजन ग्राम पंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ग्रामपंचायतीने लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवत “१०० टक्के आयुष्मान भारत कार्ड नोंदणी” तसेच ग्राम पंचायत हद्दीतील गावाचा झपाट्याने सर्वांगीण विकास करण्याचा ठाम संकल्प घेतला असून, त्याच दिशेने हे शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन सरपंच रंजिता पेंडाम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रुपाली गंधारवार, ग्राम पंचायत सदस्य विकास उंडीरवाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश सयाम, वैज्ञानिक अधिकारी वसंत पोरेटी, औषधी निर्माता अधिकारी जगदीश सिडाम, आरोग्य सहाय्यक पी. के. कवाडकर व पी. एस. बरडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिबिरामध्ये आयुष्मान भारत कार्ड नोंदणीचे काम डॉ. गोनाडे, डॉ. घोडाम, डॉ. मंडल, डॉ. केवाटे, सीएचओ कु. जुवारे, कु. मोहाड, कु. देव्हारे (मौशिखांब उपकेंद्र), कु. गेडाम, कु. मेश्राम तसेच सातपुते, कोवे, हुल्के, अभिषेक मडावी व अमर मेश्राम आदी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व कार्यक्षम पद्धतीने पार पाडले.
तसेच आशा वर्कर मंगला जांभूळकर, अल्का कुंघाडकर व गीता चापले यांनी नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या आरोग्य शिबिरात एकूण १३२ नागरिकांची आयुष्मान भारत कार्ड नोंदणी पूर्ण करण्यात आली, तर राशन कार्डमधील त्रुटी व इतर तांत्रिक कारणांमुळे ४१ नागरिकांची नोंदणी होऊ शकली नाही. त्या सर्व नागरिकांची नोंदणी पुढील शिबिरात निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल, असा ग्रामपंचायतीचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला. यासोबतच नागरिकांची ईसीजी व इतर आवश्यक आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
या शिबिरास महिला, पुरुष, युवक, युवती तसेच शाळकरी मुले-मुली यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्राम पंचायत मौशिखांबचे कर्मचारी नानू ठाकरे, बादल मोंगरकर व प्रतिभा आलम यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिबिराच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सरपंच रंजिता पेंडाम, उपसरपंच रुपाली गंधारवार व ग्राम पंचायत अधिकारी खुशाल नेवारे यांनी आरोग्य विभागाचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी बोलताना खुशाल नेवारे यांनी ग्राम पंचायत हद्दीतील गावाचा झपाट्याने व नियोजनबद्ध विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच भविष्यातही नियमित आरोग्य तपासणी शिबिरे, लोककल्याणकारी उपक्रम व शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.


0 Comments