Ideas

श्री संत संताजी जगनाडे महाराज 401 वी जयंती उत्साहात साजरी : जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम!


जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार

Right Time News

गडचिरोली : श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती गडचिरोली व समस्त तेली समाज बांधवांच्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले.

या जयंती सोहळ्यानिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर व नगरसेवकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत जगनाडे महाराज यांच्या विचारांचा समाजाला मार्गदर्शक ठरणारा वारसा असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमात नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी प्रभावी मार्गदर्शन करताना संत संताजी जगनाडे महाराज यांचे समाजसुधारणेतील योगदान अधोरेखित केले. सामाजिक एकोपा, शिक्षण, सेवा व मानवतेचा संदेश आजच्या तरुण पिढीने आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातून श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ  अर्पण करून भव्य व शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात लहान मुलींनी पारंपरिक नृत्य सादर करत मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत समाजबांधव, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संतांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त तेली समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments