Ideas

तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना 'पॅकेज' जाहीर करा -प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विश्वजीत कोवासे यांची मागणी




गडचिरोली २२ : जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर असलेल्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना दोन टप्प्यांत आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी कायमस्वरूपी लेखाशिर्ष तयार करून पॅकेज जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विश्वजीत कोवासे यांनी केली आहे. 
जिल्ह्यात यावर्षी सुरवातीला पाऊस झाला नाही. त्यानंतर सुरू झाला तर अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना धान पिकाची पेरणी करता आली नाही. ज्या शेतकऱ्यांनी धान पिकाची पेरणी केली, त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागत आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही धान पिकाची रोवणी झाली नाही. अनेक नदीनाल्यांना पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही कोवासे यांनी केली आहे. 
महागाईने उग्र रूप धारण केले असून खताचे दर कडाडले आहे. यासोबतच शेत मजुरांची मजुरी वाढली असल्याने शेतीच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. शासनाने जाहीर केलेले हमी भाव, शेतातून येणारे प्रत्यक्ष उत्पन्न व उत्पादन खर्च याचा कुठेही ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पावसाळी अधिवेशनात स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करून कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून 'पॅकेज' जाहीर करावा, अशी मागणी विश्वजीत कोवासे यांनी शासनाकडे केली आहे.  तेलंगणा राज्यात दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात आर्थिक मदत दिली जाते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना या पॅकेज च्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही विश्वजीत कोवासे यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तेलंगणाच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments