गडचिरोली १९ :
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक गावात तेंदू संकलन करणा-या आदिवासी व गैर आदिवासी तेंदू मजूरांचे मागील 4 ते 5 वर्षापासूनची तेंदूपत्याची रक्कम थकित आहे. प्रशासन स्तरावर अनेकदा उंबरठे झिजवूनही रक्कम त्यांना मिळालेली नाही. या गंभीर बाबीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. एरव्ही रस्त्यावर उतरणा-या या लोकप्रतिनिधींना तेंदू मजूरांच्या व्यथेसह जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या समस्या दिसत नाही का? अशी खरमरीत टिका सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी आज, 19 मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.
पत्रकार परिषदे बोलतांना ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, अहेरी उपविभागातील एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यातील अनेक ग्रामसभांचे 2017-22 या तेंदू हंगामातील तब्बल 20 कोटींहून अधिकची रक्कम कंत्राटदारांकडे थकित आहे. एकट्या सुरजागड इलाख्यातील गट्टा, गर्देवाडा, जांभिया, वांगेतूरी, जव्हेली या युनिटमधील 6 कोटी 30 लाखांची रक्कम संबंधित कंत्राटदारांकडे थकित आहे. यासह अहेरी तालुक्यातील कमलापूर, मोड्रा, दामरंचा, कुरुमपल्ली, किष्टापूर, गोविंदगाव, रेगुलवाही, कोंजेड आदींसह जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील अनेका गावातील तेंदू मजूरांची मजूरी थकित आहे. या थकित रक्कमेबाबत प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुनही तेंदू मजूरांना रक्कम मिळालेली नाही. परिणामी तेंदू मजूर आर्थिक अडचणीत असून त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित दोषी कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत त्यांना काळ्या यादीत टाकून नवीन कुठल्याही जिल्ह्यात अथवा राज्यात त्यांना तेंदू लिलावात सहभाग घेता येणार नाही, याची दखल घ्यावी. तसेच मागील 4 ते 5 वर्षापासून तेंदू मजूरांची मजूरी थकित असतांना स्थानिकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याची साधी दखल घेतली नसल्याचा आरोपही ताटीकोंडावार यांनी पत्रकार परिषदेतून केला.
लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही काय?
जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. आरोग्य, रस्ते, शिक्षण, पाणी, वीज आदी विविध समस्यांनी या भागातील नागरीक त्रस्त आहेत. अशातच तब्बल 4 ते 5 वर्षापासून या भागातील तेंदू मजूरांचा थकित रक्कमेसाठी संघर्ष सुरु आहे. असे असतांना एरव्ही विविध कारणांना घेऊन रस्त्यावर उतरणारे आजी-माजी लोकप्रतिनिधींना या भागातील जनतेची समस्या जाणून घेण्याची जबाबदारी नाही काय? त्यांना अहेरी उपविभागातील सामान्य जनतेला होणारा त्रास दिसत नाही का? असा सवाल संतोष ताटीकोंडावार यांनी यावेळी उपस्थित केला.
353 राष्ट्रीय महमार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा
अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या अनेक रस्त्यांची अक्षरश: दैनावस्था झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने खमनचेरु-अहेरी, आलापल्ली-सिरोंचा, अहेरी-देवलमरी, सुभाषनगर-आलापल्ली, अहेरी ते चेरपल्ली पूल यासह राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा 353 हा राष्ट्रीय महामार्ग जणू मृत्यूचा सापळा ठरत आला आहे. 353 या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत अपघातात जवळपास 120 नागरिकांचे बळी गेले आहेत. तर 84 लोकांना कायमस्वरुपी अपंगत्व आले असून 174 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या सगळया समस्यांची जबाबदारी जनसेवक म्हणून आजी-माजी लोकप्रतिनिधी का बर घेत नाहीत? असा प्रश्न ताटीकोंडावार यांनी यावेळी उपस्थित केला.
0 Comments