Ideas

जिल्हयात शेतकऱ्यांसाठी ॲग्री मॉल होणार – जिल्हाधिकारी, संजय मीणाकृषी महोत्सव 2022 चे आमदार रामदास आंबटकर यांचे हस्ते उद्घाटन

गडचिरोली, दि.12 डिसेंबर : जिल्हा मुख्यालयी शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रशस्त असा ॲग्री मॉल उभा करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कृषी महोत्सव 2022 च्या उद्घाटनावेळी सांगितले. आत्मा, कृषि विज्ञान केंद्र व कृषी विभाग गडचिरोली यांनी पुढाकार घेतला तर शेतकरी ॲग्री मॉल आपण येत्या दोन वर्षात उभारू असेही ते पुढे म्हणाले. कृषी विद्यालयाच्या प्रांगणात आत्मा, नाबार्ड व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ.देवराव होळी व जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर अतिरीक्त पोलीस अधीक्षक अनुज तारे, प्रकल्प संचालक आत्मा संदिप कऱ्हाळे, सहयोगी अधिष्ठाता कृषी विद्यालय छाया राऊत, प्रतिभाताई चौधरी, डीडीएम त्रुणाल फुलझेले, माविम चे सचिन देवतळे उपस्थित होते.  यावेळी दीपप्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले.


           यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकरी मीणा म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात वनोपज उपलब्ध आहेत. तसेच येथील शेतकरी भाजीपाल्यासह नाविण्यपूर्ण पीके घेत आहे. जिल्हयातच मोठी बाजारपेठ उभी राहू शकते. कृषी विज्ञान केंद्राला सांगून येत्या दोन वर्षात चांगला शेतकरी ॲग्री मॉल उभारून विक्री बरोबरच शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देणारे ठिकाण एकत्रित उभे करता येईल. ते पुढे म्हणाले, जिल्हयात विकासात्मक कामांना गती मिळत आहे. मोबाईल कनेक्टीव्हीटी वाढविली जात आहे. 544 टावर उभे करण्यास सुरूवातही झाली आहे. आर सी ई मधून रस्त्यांची उभारणी केली जात आहे. तसेच गोंडवाना जमीनाचा प्रश्न सुटला. एकल केंद्र स्थापन करून जिल्हयातील 1438 ग्रामसभांना सक्षम बनविण्यास सुरूवात झाली आहे. मागील मौसमात इतिहासातील सर्वात जास्त पाऊस पडला. यामूळे काही कामांना वेळ लागत आहे. जिल्हयातील सामान्य नागरिकांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारणे हाच प्रशासना प्रमुख हेतू आहे असे ते यावेळी म्हणाले.


         उद्घटनीय भाषणात आमदार आंबटकर यांनी शेतकरी व सहयोगी गटाला शेतकरी महोत्सवातून फायदा होईल असे प्रतिपादन केले. जिल्हयात वेगाने विकास होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यासाठी अधिकारी वर्गाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. अधिकारी वर्गाकडे कामाचा योग्य दृष्टीकोण असल्यास विकास कामांना गती येते. कृषी महोत्सवातून शेतकऱ्यांना ज्ञान तर मिळतेच पण आपले कौशल्य दाखविण्याची संधीही मिळते असे ते यावेळी म्हणाले.


Post a Comment

0 Comments