Ideas

आदिम निसर्ग पुत्रांची स्वभान व अस्तित्व संघर्ष गाथा: धरती आबा बिरसा मुंडा नाटक

गडचिरोली - आष्टी १३ :  भारताचा इतिहास हा संघर्ष, बंड, उठाव, आंदोलन,क्रांतीलढ्यानी रंगलेला इतिहास आहे. अनेक वी गार पराक्रमांच्या शौर्यगाथांनी सजलेला आहे. त्याग, समर्पण, आहुती, बलिदान , चेतना, संघर्ष याने.   अंकित झालेला आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता निरंतर लढणाऱ्या शुरांच्या वीर गाथानी मुद्रीत झालेला आहे. त्या जननायकात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे कार्य सुवर्णअक्षरांनी कोरावे असे विलक्षण आहे. अदिम जनचेतनेचा वेध घेणारे चुडाराम बल्लारपुरे यांचे धरती आबा बिरसा मुंडा हे  क्रांतीनाटय संघर्ष  गाथा अधोरेखित करणारे सर्वस्पर्शी व विचारप्रवृत्त  आहे.जुलमी ब्रिटिश राजवट व जमीनदार या विरुद्धचा आक्रोश धरती आबा बिरसा मुंडा नाटक आहे.जल ,जंगल, जमीन व  स्वधर्माविषयीचा अस्तित्व लढा म्हणजे धरती आबा बिरसा मुंडा नाटक आहे.

         भारत भूमी ही विविध जाती -धर्मांनी ,संप्रदाय, संस्कृतीने नटलेली संपन्न भूमी आहे. या भूमीवर अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन येथील समाजाला जागृत करण्याचे कार्य केलेले आहे .प्रामुख्यानेजंगलात,दऱ्याखोऱ्यात, कड्या कपारीत मुख्य प्रवाहापासून दूर परंतु निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आदिवासी समाज हाच इथला मूळ निवासी समाज आहे. या अनुसूचित जमातीमधील स्वाभिमान जागृत करीत स्वधर्म, स्वभाषा, संस्कृतीचा जागर करणारा बिरसा मुंडा या क्रांतिकारकत्वाचे योगदान इतिहासात अत्यंत दखलपात्र असतानाही म्हणावे तशी दखल इतिहासकारांनी घेतली नाही.  त्याचे कार्य समोर आलेले नाही. ही खंत, ही उणीव दूर करण्यासाठी ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी आदिवासी समाजातील क्रांतिकारक नेतृत्व ज्याने अल्पावधीत ब्रिटिशांसारख्या बलाढ्य सत्तेपुढे न झुकता न डगमगता लढवय्याची भूमिका घेऊन उपलब्ध बळावरच निकराची झुंज दिली. अशा दुर्लक्षित परंतु ऐतिहासिक दृष्ट्या मोलाचे योगदान देणाऱ्या बिरसा मुंडा सारख्या क्रांतिकारकात्वाचे कार्य सर्वांसमोर नाट्याच्या माध्यमातून यावे, याकरिता ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी धरतीआबा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा या क्रांतीनाटयाचे लेखन केलेले आहे.

        ज्येष्ठ रंगकर्मी चुडाराम बल्हारपुरे लिखित ,अनिरुद्ध वनकर दिग्दर्शित धरतीअबा बिरसा मुंडा हे विचारप्रवृत्त नाटकाचा ६ डिसेंबर २२ ला  गोंडपिपरी येथे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात  प्रयोग झाला .बिरसा मुंडा यांचे बालपण, परिस्थिती, वातावरण, जडणघडण , ऐतिहासिक कार्य ,वैचारिक क्रांतीचे  ३ अंकात लेखन नाटककाराने प्रत्ययकारीपणें  केले आहे. पहिल्या अंकात बिरसाचा जन्म, बालपण, जडणघडण दुसऱ्या अंकात मुंडा समाजाला संघटित करून आंदोलनाची सज्जता तर तिसरा अंक ब्रिटिशाविरुद्ध युद्ध, बिरसाला अटक, तुरुंगवास, विषप्रयोग, मृत्यु असा आहे.



     बिरसा मुंडा यांचे बकाल वास्तव्य, दारिद्र्य ,परिस्थितीशी झुंज देत कौटुंबिक वाताहातीचे जगणे किंबहुना  ब्रिटिशांनी जबरदस्तीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावयास लावून त्या धर्माच्या अनुपालनाची केलेली सक्ती ,आदिवासी विरोधी ब्रिटिश कायदे या सर्व बाबी प्रेक्षकांसमोर मांडण्यात नाटककार, कलावंत व दिग्दर्शक यशस्वी झाले. जुलमी ब्रिटिश राजवट, अन्यायी छळवादी जमीनदार यामुळें त्रस्थ आदिवासींचा संताप, चीड, उद्वेग, आक्रंदन परिणामी उफाळून आलेला विद्रोह म्हणजेच हे नाटक होय. जंगल आणि जमिनीसाठीचा बिरसा मुंडा यांचा अस्तित्व लढा व संघर्ष  सर्वश्रुत आहे.बिरसा मुंडा यांचे क्रांतिकारकत्व, सहकाऱ्यांनी केलेले योगदान, मुंडा समाजाला जागृत करण्याकरिता त्यांनी केलेला संघटनकौशल्याचा व युक्तिवाद कौशल्याचा वापर या अनुषंगाने नाटकातील केलेली मांडणी सरस व परिणामकारक ठरली. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा जीवन संघर्ष व कार्य निश्चितच प्रेरणादायी स्वरूपाचे असल्याचा संदेश देण्यात यशस्वी ठरले. 

   बिरसाचा जन्म ,बालपण, ख्रिश्चन धर्म प्रसाराचा धिकार, संघटन, जंगल व जमिनीकरिता आंदोलन, ब्रिटिशांशी संघर्ष, नातेवाईकाकडून फसवणूक , तुरुंगवास, शिक्षा तुरुंगातच हैजाने आजारी असल्याचा बेबनाव करण्यात येऊन विष देउन मारण्यात आले असे विविध प्रसंग पाहताना प्रत्यक्ष इतिहास डोळ्यासमोर उभा होतो.बिरसा या व्यक्तिमत्वातील बासरीवादक,अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारा क्रांतिकारक,नेतृत्व, धर्म संस्थापक, चमत्कारी व्यक्तिमत्व, वैद्य, अंधश्रद्धा नाकारणारा , भूतदया वादी, निसर्गवादी, समाजसेवक व संघर्षशील  हे वेगवेगळे  पैलू नाटकातून मांडण्यात आले आहेत.


'अबूआ राज ऐते जाना- महाराणी राज  टुंडू  जाना ' हा नारा व घोषणेचा उच्चार होताच मुठी आवळत रोमांच उभे राहतात. या नाटकातील तिसऱ्या अंकातील  (डोमबाडी पहाडीवरील) प्रवेश तिसरा मधील बिरसाचे संवाद तर नाटकातील गाभाभूत सारच  म्हणावा लागेल असा समर्पक आहे.

बिरसा: सगा साथीनो आता वेळ आली आहे उलगुलानची. आपणाला परकीय सत्तेची गुलामी खपवून घ्या घ्याची नसेल . मुंडा राज स्थापन करायचं असेल तर क्रांती आवश्यक आहे... मुंडाराज रक्त मागत आहे.. बोला आपण आपलं बलिदान करायला तयार आहात?... माझ्या आदिवासी बांधवानो! तुम्ही खंबीर बना. मुंग्यासारखे परिश्रमी बना .पशुपक्ष्यांसारखे एकमेकांवर प्रेम करा .भूतदयां- पिशाच्च यावर विश्वास ठेवू नका. कुठलीही अंधश्रद्धा बाळगू नका. देवी -देवतांना पशु पक्षांचा बळी देऊ नका .या धरती मातेचे ऋण आपल्याला फेडायचं आहे .आपल्या मुंडा समाजाचे अस्तित्व आपल्याला टिकवायचे आहे. त्यासाठी या धरती मातेच्या वीर पुत्रांनो एक व्हा.. एक मताने एकजुटीने बोला ऊलगुलान ... उलगुलान..1 ऑक्टबर 1894 बीरसा पुढाकार घेऊन नेतृत्व करतो. ब्रिटिशा सारख्या बलाढ्य सत्तेला सळो की फळ करून सोडतो हे विशेषच.    



      सन १८७५-१९०० या कालावधीमध्ये  घडलेला जीवनप्रसंग नेपथ्य आणि कल्पकतेमुळे दिग्दर्शकाने यशस्वीपणे प्रेक्षकांसमोर साकार केला आहे. सामान्य माणसातील  असामान्यत्व नाटककाराने यथोचित मांडले आहे . जुलमी ब्रिटिश व जमीनदाराविरुद्धचे आक्रंदन तथा जनचेतनेचा, विद्रोहाचा ,अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करणारा हा जननायक आदर्श स्वरूपाचा साकारला आहे. बाल बिरसा (रुचित निनावे), जुलमी इंग्रज राजवट व जमीनदारांच्या विरोधामध्ये  जमीन, जंगल, स्वसंस्कृती यासाठी सर्वंकष उठावाचा उलगुलानचा नारा देणारा बिरसा मुंडा (निखिल मानकर), आदिवासींचे सर्वकष शोषण करण्यासाठी कूट नीतीचा व बळाचा वापर करणारा जुलमी इंग्रज अधिकारी डेप्युटी कमिशनर(प्रवीण भसारकर ), अधिकाऱ्याला साथ देणारा छळवादी स्ट्रीटफिल्ड (जुगल गणवीर), फादर नट्रोट(प्रवीण भसारकर), सुगनामुंडा कुटुंबाचा हितचिंतक व विविध आजारांवर औषध देणारावैदुबा (रवी धकाते), बिरसा च्या क्रांती लढ्यात खांद्याला खांदा देत सदोदीत साथ देणारा गया (कार्तिक शेंडे), बिरसाचे वडील सुगनामुंडा (भारत रंगारी ),आदिवासींचे शोषण करून इंग्रजांना बळ देत नेहमी मदत करणारा बदगावचा क्रूर, लालची जमीनदार जगमोहनसिंग ( अखिल भसारकर),  नृत्यकलेत निपुण् असलेली   आलीनाबाई( प्राची नगराळे),वंचित दुर्लक्षित समाजाला शिक्षणाचे धडे देणारे समाज शिक्षक जयपाल नाग (प्रमोद दुर्गे ),बिरसाला भविष्याचा अचूक वेध सांगणारे देव पुजारी भूमकाल (अभिषेक मोहुर्ले )बिरसाच्या क्रांती लढ्यात समर्पित भावनेने सोबत असलेला सीमा मुंडा (नागसेन खंडारे ) व डोका मुंडा( अभिषेक मोहुर्ले), इंग्रजांपर्यंतचा लढा बुलंद करण्याकरिता  बिचवे, तिरकमठा, गुलेर अशा शस्त्रांची निर्मिती करणारा धनिया मुंडा व  शस्त्रसाठा बिरसांना देणारा  व बिरसाइटात सक्रीय सहभागी होणारा दंतू मुंडा (प्रा.राजकुमार मुसने),मिशनरी स्कूलचे संचालक आणि आदिवासींना धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणारे फादर नट्रोट (विजय गुरनुले ), बिरसाला धार्मिक शिक्षण देणारे संगीतकार आनंद पांडे गुरुजी (अखिल भसारकर), बिरसाला साथ देणारे बिरसाचे संदेश वाहक असे विनोदी पात्र कोमता -झिप्री (जागृती निखाते), झिपऱ्या (शशिकांत मगरे),बक्षीसाच्या लालसेने फितूर होऊन बिरसाला पकडून देणारे जोगना व काली जोडपे,बिरसाची आई

 करमी( राणी धुळे), बिरसाचा भाऊ त्याला शिक्षणासाठी सहकार्य करणारा कोनू ( प्रज्वल निखार), बिरसाची पत्नी हिरीबाई ( स्मिता  देठे),सैनिक (विजय गुरनुले व प्रज्वल निखार) या कलावंतांच्या कसदार अभिनयामुळे सदर नाट्य प्रेक्षकापर्यंत प्रत्ययकारीपणे पोहोचविले गेले. झिपऱ्या झिपरी यांच्यातील नर्म विनोद व फादरचा ओ माय गॉड ओ माय येशू संवांदाच्या पूनरुक्तीमुळे प्रेक्षकास हसायला भाग पाडले. बिरसाचा जीवन संघर्ष पाहताना भारवणारा प्रेक्षक प्रेरितही होत होता. शेवटच्या प्रसंगाने तर सर्वांना अंतर्मुख केले. पात्र ,संवाद ,नेपथ्य आणि संगीत संयोजनामुळे धरती आबा बिरसा मुंडा या क्रांतीनाट्याचा ६ डिसेंबरला गोंडपिंपरी येथील रसिकांनी प्रारंभा पासून शेवटपर्यंत  रसिकतेने आस्वाद घेतला.

 रेला रेला रे रेला, घे मशाल घे क्रांतीची मशाल घे नव्या क्रांतीची पहाट झाली मशाल घे, जन्माला आला शेर जंगलाचा सव्वाशेर थयथय नाचाया रानाच्या छाताडावर , उलगुलान  घे उलगुलान, मुडद्याला दागिन्याची गरज हाय काय माय विकून पोट भरलं तर बिघडलं काय माय, येरे बिरसा परतुनी ये पुन्हा' अशा आशयवाहक गीतातून नाट्य उलगडत पुढे जाते व प्रेक्षकांच्या मनाची ठाव घेते. ईश्वर खोब्रागडे, लोकेश दुर्गे, विपीन राऊत यांच्या संगीताच्या साथीमुळे  नाट्य प्रयोगात रंगत येत प्रेक्षकांच्या स्मरणात राहते.

     नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांनी व्यासंग व सातत्यपूर्णतेने  धारदार आणि वास्तव असं केलेले लेखन आणि सव्यसाची जाणकार अनिरुद्ध वनकर या दिग्दर्शकांच्या कल्पकतेने विविध जागांच्या समुचित उपयोजनामुळे नाटक पाहण्यास मजा आली.  दिव्यशक्तीप्राप्तीसांरख्या प्रसंगाची दिग्दर्शकाने केलेली उभारणी  वाखाणण्यासारखीच. नृत्यातून प्रसंग -पट पुढे नेण्याची हातोटी विशेषत्वाने स्तुत्य व कल्पकतेस सलाम.

ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्लारपुरे यांचं सृजनशील लेखन ,कल्पक दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांचे दिग्दर्शकत्व व कसदार कलावंतांच्या सकस भूमिका या संयुक्त रसायनामुळे बिरसा मुंडा हे लोकधर्मी नाटय रंगभूमीवर परिणामकारकपणे सादर झाले.

  विविध प्रसंग, संगीत संयोजन,  प्रसंगानुरूप  नेपथ्याचा वापर, बिरसा मुंडा यांच्या चरित्राचा घेतलेला धावता आढावा व कसदार कलावंतांच्या अभिनयामुळे हे नाटक उत्तमरित्या साकार करण्यात लोकजागृती संस्था यशस्वी ठरली.

प्रा. डॉ.राजकुमार मुसणे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी, जि. गडचिरोली ९४२३६३९५३२

Post a Comment

0 Comments