दारू न पिता नववर्षाचे स्वागत करा ! नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे आव्हान
राजेंद्र सहारे
राईट टाइम न्यूज
8830435322
गडचिरोली: 31 डिसेंबर *मुक्तीपथ जिल्हा दारूमुक्त अभियान व निर्माण युवा चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज 31 डिसेंबर रोजी गडचिरोली शहरात एक प्रभावी व आक्रमक जनजागृती रॅली काढण्यात आली. नववर्षाचे स्वागत दारू न पिता, दारू सोडण्याची शपथ घेऊन ‘दारूमुक्त गडचिरोली शहर’ घडवण्याचा निर्धार या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.
या रॅलीत शहरातील मोठ्या संख्येने युवक-युवती, पुरुष व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “दारू नको – भविष्य हवं”, “दारूमुक्त गडचिरोली, समृद्ध गडचिरोली” अशा आक्रमक घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारूऐवजी सामाजिक बांधिलकीचा संदेश देत युवकांनी समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भावनिक शब्दांत सांगितले की, “गडचिरोली जिल्हा अधिकृतपणे दारूबंदी असतानाही अवैध व मिलावट दारूचा काळा धंदा सुरू आहे. या दारूमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. माझ्या भावांचे, माझ्या बहिणींचे घरे घरे उद्ध्वस्त झाली आहेत. दारूने कित्येक संसार रस्त्यावर आणले आहेत. हे थांबवण्यासाठी मी नगराध्यक्ष म्हणून पूर्णपणे कटिबद्ध आहे. गडचिरोली शहर दारूपासून मुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.”*
दारूमुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबे, भरकटत चाललेली तरुण पिढी आणि वाढती सामाजिक अराजकता याविरोधात हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या सुरुवातीलाच दारूविरोधात असा ठोस व आक्रमक संदेश देत गडचिरोलीतील युवकांनी संपूर्ण जिल्ह्यासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
ही रॅली म्हणजे केवळ नववर्षाचे स्वागत नसून, दारूमुक्त गडचिरोलीसाठी सुरू झालेल्या सामाजिक क्रांतीचा एल्गार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.
यावेळी उपस्थित डॉ अमृत बंग, विलास निंबोरकर, सावदकर साहेब संचालक मुक्ती पथ, विठ्ठल राव कोटारी, किशोर खोब्रागडे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments