योगिता मधुकर भांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
राईट टाइम न्यूज
गडचिरोली जिल्ह्यातील मौजा वालसरा येथे फ्रेंड्स सर्कल क्रिकेट क्लब, वालसरा यांच्या वतीने भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच युवकांमध्ये मैत्री, एकोपा व क्रीडास्पृहा वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन माननीय सौ. योगिता मधुकर भांडेकर, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली तथा गडचिरोली जिल्हा नियोजन समिती सदस्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर सह-उद्घाटक म्हणून माननीय श्री. मधुकर केशवराव भांडेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष गडचिरोली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय सौ. मनीषाताई निलेश आत्राम, सरपंच गट ग्रामपंचायत वालसरा होत्या. दीपप्रज्वलन माननीय श्री. भगरथ भांडेकर, पोलीस पाटील वालसरा यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. योगिता भांडेकर यांनी क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, संयम आणि नेतृत्वगुण विकसित होतात. युवकांनी खेळामध्ये करिअर घडविण्याचा ध्यास घ्यावा. युवक मंडळांच्या माध्यमातून खेळाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून प्रत्येक गावात गुणवंत खेळाडू निर्माण करावेत. असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले.
यावेळी मधुकर भांडेकर यांनीही युवकांशी संवाद साधत क्रीडा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे मत व्यक्त करून आयोजकांचे कौतुक केले.
स्पर्धेतील उद्घाटन सामना तळोधी (मो.) विरुद्ध कुनघाडा (रै.) या संघांमध्ये रंगला. संपूर्ण स्पर्धेत परिसरातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सामने अत्यंत चुरशीचे व रोमांचक ठरले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी व युवक उपस्थित राहून खेळाडूंना जल्लोषात प्रोत्साहन देत होते.
या कार्यक्रमास माननीय श्री. रघुनाथ भांडेकर सर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गडचिरोली, श्री रमेशभाऊ नरोटे तालुकाध्यक्ष आदिवासी आघाडी भाजपा, गजानन पाटील मूलकलवार, मारोती दुधबळे, सुरेश भांडेकर, गजानन सातपुते, खंडूसिंग खसावत, वामनजी कारडे (आमगाव महाल), जितेश बारसागडे (कुरुड), विनायक बारसागडे, खुशाल दुधबळे, सत्यवान पिपरे, अशोक दुधबळे, दयाल भांडेकर, दिवाकर दुधबळे, पत्रुजी दुधबळे, रामचंद्र भांडेकर, मनीष भांडेकर, भाऊराव चक्रवर्तीवार तसेच गावातील नागरिक, परिसरातील युवक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मूलकलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल येडेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल फ्रेंड्स सर्कल क्रिकेट क्लब, वालसरा येथील सर्व पदाधिकारी व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील क्रीडासंस्कृतीला बळ देणारा हा उपक्रम निश्चितच युवकांसाठी प्रेरणादायी ठरला, असे मत उपस्थित क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.


0 Comments