गडचिरोलीः गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात सोमवार 18 ऑगस्ट रोजी दुपारी पक्षाचे एका शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांची भेट घेवून त्यांना याबाबतचे लेखी निवेदन सादर केले. व कंत्राटी शिक्षकांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली जिल्हयात सुमारे ५५० हुन अधिक कंत्राटी शिक्षक दरमहा २०,००० एवढ्या अत्यल्प मासिक मानधनावर मागील काही वर्षापासून काम करीत असून जिल्ह्याच्या दुर्गम भागात सेवा देत आहेत व मुलांना घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत. परंतु या शिक्षकांना बÚयाच अडचणींचा सामना करावा लागत असून त्यामुळे त्यांचे आर्थिक, मानसिक नुकसान होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
कंत्राटी शिक्षकांचे मार्च २०२५ पासूनचे थकलेले मानधन त्वरित अदा करण्यात यावे. कंत्राटी शिक्षकांचे मानधन दरमहा नियमितपणे देण्यात यावे. कंत्राटी शिक्षकांना प्रवास भता व आरोग्य सुविधा नियमानुसार शासकीय निधीतून देण्यात याव्या. गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम व भौगोलिक दृष्ट्या कठीण असल्यामुळे कंत्राटी शिक्षकांचे मानधन दरमहा किमान १०,००० रुपयांनी वाढविण्यात यावे. कंत्राटी शिक्षकांना मागिल सत्रातील वाढीव 5,000/- रुपये एरियर्स देण्यात यावे, इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता.
वरील सर्व समस्यांची त्वरित सोडवणूक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या समस्यांची सोडवणूक न झाल्यास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते जगन जांभूळकर, सुखदेव वासनिक, जिल्हा संघटक हेमचंद्र सहारे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दादाजी धाकडे, अरूण भैसारे, भरत जांभूळकर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
0 Comments