पहिल्याच दिवशी नागरीक त्रस्त, आल्या पावली परतावे लागले
राईट टाईम न्यूज
गडचिरोली ०३ :
ग्रेड पे वाढीच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करुन देखील दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेेने जाहीर केल्यानुसार आज (दि.3) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या राज्यव्यापी आंदोलनात संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा तहसिलदार महेन्द्र गणवीर यांच्या नेतृत्वात जिल्हाभरातील १३ तहसिलदार व ४९ नायब तहसिलदार सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे महसूलसह विविध विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा व तहसिल कार्यालयामध्ये अधिकारी वर्गच नसल्यामुळे, पहिल्याच दिवशी कामानिमित्त कार्यालयामध्ये आलेले नागरिक त्रस्त होऊन, त्यांना आल्यापावली परतावे लागले.
राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग-2 चे नसल्याने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत 1998 पासून संघटनेच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. शासनस्तरावर मागणीचा अद्याप कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे राजपत्रित वर्ग-2 चे ग्रेडपे 4800/- करण्याबाबत संघटनेच्या वतीने यापूर्वी बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. तेव्हा तत्कालीन अपर मुख्य सचिव, महसूल मंत्री व वित्त मंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे तसेच के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समितीने नायब तहसिलदारांचे ग्रेड पे 4800/- वाढविण्याबाबत सादरीकरण करुन देखील मागणीचा कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे नायब तहसिलदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून संघटनेच्या वतीने सोमवार, 3 एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेेचे जिल्हाध्यक्ष तथा तहसिलदार महेन्द्र गणवीर, मोहन टिकले अधिक्षक, ओंकार ओतारी तह. अहेरी, सोमनाथ माळी तह. कुरखेडा, अनमोल कांबळे, तह. भामरागड, सर्व्हेश मेश्राम, तह. मुलचेरा, नायब तहसिलदार अमोल गव्हारे, सत्यनारायण अनमदवार, संजय राठोड, गौरीशंकर चव्हाण, ज्ञानेश्वर ठाकरे, धनराज वाकुडकर, प्रकाश पुप्पलवार, राजकुमार धनबाते, विलास तुपट, नैताम, जनक काळबाजीवार, ललित लाडे, विनोद बोडे, राजू वैद्य, सुखदेव कावळे, फारुख शेख, गजभिये, सोनवानी, चकोले, दाते, हरीदास दोनाडकर, डी. के. वाडके, तलांडे, श्रीमती आम्रपाली लोखंडे, संगीता धकाते, मनोरमा जांगी, सुरपाम, प्रियंका मानकर, रेखा बोके, हनुमंते, यांच्यासह जिल्ह्याभरातील सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार संपामध्ये सहभागी झाले होते.
शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा - विभागीय सरचिटणीस संजय राठोड नायब तहसिलदार
ग्रेड पे वाढविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने 3 मार्चपासून सर्व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन टप्प्याटप्प्याने आंदोलन आले होते. तरी देखील शासनाने दखल न घेतल्यामुळे 3 एप्रिल पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बेमुदत कामबंद आंदोलनानंतर तरी शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
0 Comments