Ideas

गडचिरोलीत एकाच मंडपात 127 जोडप्यांचे शुभमंगल...! पोलीस दल व मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम




राजेन्द्र सहारे - राईट टाईम न्यूज

पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्हयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. आदिवासी बांधवांची भयमुक्त वातावरणातून मुक्तता करणे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामुहिक विवाह सोहळा देखील त्याच शृंखलेतील एक उपक्रम आहे. दुर्गम भागातील आदिवासी वर- वधू यांना नवजीवनाची उत्साहात सुरवात करून देण्याकरीता तसेच आदिवासी संस्कृती जोपासण्याकरीता गडचिरोली पोलीस दल व मैत्री परिवार संस्था नागपूर यांच्या वतीने रविवारी (ता. २६) तब्बल १२७ आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा एकाच मंडपात मोठया उत्साहात गडचिरोली शहरातील अभिनव लॉन मध्ये पार पडला. या विवाह सोहळयाला जिल्हयातील लोकप्रतिनीधी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी उपस्थित राहून वधू- वरांना त्यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


सामुहिक विवाह सोहळयासाठी चंद्रपूर मार्गावरील अभिनव लॉनचा परिसर भव्य मंडप व सुशोभिकरणाने उजळला होता. वराती मध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसह १२७ जोडपे होते. या वरातीने समस्त गडचिरोली शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. विवाह सोहळयापुर्वी शहरातील मुख्य मार्गाने बँडबाजा च्या गजरात वरात काढण्यात आली. वरात मंडपात पोहचल्यानंतर सामुहिक विवाह सोहळा पार पडला. दोन दिवस चाललेल्या या विवाह सोहळयातील सहभागी जोडप्यांना पहिल्या दिवशी लग्नाचे साहित्य व संसारपयोगी साहित्य, वधूंना मंगळसुत्र नवे कपडे देण्यात आले. त्यानंतर आज रविवारी दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळयानंतर जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती.


विवाह सोहळयाला खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णाजी गजबे, केंद्र शासनाचे अतिरक्त सचिव राजकमल पाठक, केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाच्या माजी अध्यक्ष शुभा मिश्रा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, यतिश देशमुख, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, गडचिरोली शाखेचे अध्यक्ष निरंजन पाटील वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सामुहिक विवाह सोहळयाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यासह अंमलदार, इतर शाखेचे प्रभारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार व पोलीस कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments