Ideas

घरात विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षाचा कारावास




जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

गडचिरोली : जिल्हा व सत्र न्यायालयाने विनयभंग करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ४ जानेवारी रोजी बुधवारी सुनावली. गणेश मनोहर म्हशाखेत्री (३४, रा. कुरुड, ता. चामोर्शी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी गणेश मनोहर म्हशाखेत्री (रा. कुरुड) हा ३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडिता (फिर्यादी) ही स्वतःच्या घरी जेवण करीत असताना पिण्यासाठी पाणी मागण्यासाठी आला. तिने त्याला पाणी दिले. त्यानंतर आरोपीने जेवण मागितले. त्यावर पीडितेने तुझ्या घरी जेवण नाही का, असे म्हणाली. त्यावेळी आरोपी हा आपल्या घरी निघून गेला. पण थोड्याच वेळात आरोपी पीडितेच्या घरी पुन्हा आला व पीडितेच्या अंगावर धावून तिचा विनयभंग केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिचे तोंड दाबले.

दरम्यान, पीडितेच्या ओरडण्याच्या आवाजाने सभोवतालच्या महिला गोळा झाल्या. तेवढ्यात पीडितेचा भाचा तिथे आला व दरवाजा उघडला असता आरोपी हा घरातच सापडला. त्यावेळी भाच्याने आरोपीच्या दोन गालावर थापडा मारल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. सदर घटनेबाबत आरोपीविरोधात चामोर्शी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. भादंविचे कलम ३७६ (१), ५११, ४५०, ३५४ (अ), ३५४ (ब), ३२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपी गणेश मनोहर म्हशाखेत्री याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय बा. शुक्ल यांनी कलम ३५४(ब) भादंविमध्ये ३ वर्ष कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा, तसेच कलम ३२४ मध्ये १ वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Post a Comment

0 Comments