Ideas

बदनामी करणाऱ्यांना 1 कोटी रूपयांची मानहानीची नोटीस व पोलिसांत तक्रार आ.डॉ.देवराव होळी यांची पत्रकार परिषदेत माहिती



गडचिरोली, ०६ डिसेंबर :- "मेक इन गडचिरोली"च्या नावाने अगरबत्ती क्लस्टर व मत्स्य तलाव यामध्ये फसवणूक केल्याच्या विरोधात दि. ३० नोव्हेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकामध्ये काही लोकांनी उपोषण आंदोलन सुरू केले असून प्रसिद्धी पत्रकांच्या व व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी मेक इन गडचिरोली अंतर्गत फसवणूक केली असे आपल्यावर आरोप करीत आपली प्रचंड बदनामी केलेली आहे. त्यांनी केलेले आरोप खोटे, निराधार व बिनबुडाचे असून आपली वारंवार बदनामी करणाऱ्यांना आपण १ कोटींच्या मानहानीची नोटीस व त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महामंत्री गोविंद सारडा, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष योगिता भांडेकर, नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, भाजपा गडचिरोली तालुक्याचे अध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुक्याचे अध्यक्ष दिलीप चलाख, पंचायत समितीचे माजी सभापती विलास दशमुखे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्करराव बुरे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, तालुक्याचे महामंत्री हेमंत बोरकुटे, साईनाथ बुरांडे, भोजराज भगत, राजू खंगार, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रतीक राठी पदाधिकारी विलास नैताम, तालुका सचिव किशोर गटकोजवार, विजय गेडाम संजय चलाख, काशिनाथ बुरांडे, भुवनेश्वर चुधरी, रामचंद्र वरवाडे, यांचे सह गोंडवाना अगरबत्ती क्लस्टरच्या प्रमुख पदाधिकारी वैशाली हुस्के, निर्मला कोटावार, तसेच उद्योजिका प्रामुख्याने उपस्थित होते.

आ. डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये एखाद्या व्यक्तीने दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली असल्यास पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यास न्यायालयात गुन्हा नोंद करण्याबाबत अर्ज देण्याची तरतूद आहे. असे असताना न्यायालयात गेलास त्यांचा अर्ज खारीज होऊन त्यांच्यावर दंड आकारला जाऊ शकतो याची त्यांना माहिती आहे. न्यायालयामार्फत कारवाई केल्यास माझी बदनामी करण्याचा त्यांचा हेतू सफल होऊ शकत नाही याची त्यांना कल्पना असल्याने माजी वारंवार बदनामी केली जात आहे. त्यांची खरंच मी फसवणूक केली असल्यास त्यांनी माझ्या विरोधात न्यायालयात जावे उत्कृष्ट वकिलाची स्वतः नेमणूक करावी त्याकरिता लागणारा खर्च सुद्धा मी देण्यास तयार आहे.  माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी दोषी असल्यास नक्कीच माझे विरुध्द कारवाई होईल. मात्र न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग खुला असतानाही  प्रकरणाची पूर्ण सत्यता त्यांना माहीत असल्याने तिथे न जाता प्रसार माध्यमातून माझी बदनामी करण्यासाठीच त्यांनी असे मार्ग अवलंबिलेले आहे.

यापूर्वीही माझ्यावर असे खोटे, बनावटी ,निराधार व तथ्यहीन आरोप करण्यात आले असून या आरोपांविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिसांमार्फत पूर्ण ताकदीनिशी चौकशी होऊन तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले आहे. तथ्य नसल्याबाबतचे सूचना पत्र पोलिसांकडून दि. १७/८/२०२१ रोजी प्रसिद्धही करण्यात आले आहे. तरीही केवळ राजकीय सूडबुद्धीने  अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करित असल्याचा आरोप आमदार डॉ. देवराव होळी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.

आपली नाहक बदनामी करणाऱ्यांना आपण वकिलांच्या माध्यमातून १ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असून त्याबाबतची नोटीसही पाठविली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे याकरिता पोलिसात तक्रार केलेली आहे. आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे "मेक इन  इंडिया" व महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मेक इन  महाराष्ट्र"ही संकल्पना मांडली त्याच आधारावर आपण "मेक इन गडचिरोली" ही नव संकल्पना मांडून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू केले. मेक इन गडचिरोली ही काही माझी संस्था किंवा संघटना नाही ही केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी मांडलेली एक "नव संकल्पना"आहे. जिल्ह्यात नवीन उद्योग निर्मिती व्हावी याकरिता नवउद्योजकांना प्रेरित करण्यासाठी दिनांक १ जानेवारी २०१७ ते ३० जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये गडचिरोली जिल्ह्या त उद्योग क्रांती रथयात्रा काढली. जिल्ह्यातील १२ पैकी ११ तालुक्यात १ महिना पूर्णवेळ दौरा करून नव उद्योजकांना प्रोत्साहित केले. यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योगाचे वातावरण निर्माण केले. अनेकांना जिल्ह्यातील एमआयडीसी मध्ये उद्योगासाठी जागा मिळवून दिली. त्यातील काहींचे उद्योग प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील महिलांना रोजगार मिळावा याकरिता नविन उद्योजकांना प्रेरित करून अगरबत्ती क्लस्टरची निर्मिती केली. मच्छी पालनासाठी अनेकांना निल क्रांती या शासकीय योजनांमधून लाभ मिळवून दिला. या सर्व योजनांमध्ये मी कुठेही प्रत्यक्षात सहभागी झालो नाही केवळ शासकीय योजनांचा या नवीन उद्योजकांना व रोजगार घेऊ इच्छिणाऱ्यांना लाभ मिळावा याकरिता आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. याकरिता झालेले सर्व आर्थिक व्यवहार हे जिल्हा उद्योग केंद्र, सरकारी बँका व शासकीय कार्यालय यांच्या मार्फत झालेले असून यामध्ये योजना राबविणाऱ्या सर्व शासकीय यंत्रणा आहेत.

शासनाचे सर्व नियम पाळून सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे व शासकीय नियमांच्या आधारावर बँकेच्या मार्फत झालेले आहे. सर्व लाभार्थ्यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने स्वतः समजून हे उद्योग सुरू केलेले आहेत यामध्ये ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे उद्योग अजूनही सुरू असून ते उत्तमपणे चालवीत आहेत. मात्र ज्यांना केवळ यात राजकारण करायचे आहे त्यांनीच आपली फसवणूक झाली असा कांगावा करीत आहेत. यापूर्वीही त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशन मध्ये आपल्या विरोधात तक्रार करून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी गडचिरोली पोलिसात मार्फत  अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली.  चौकशी अंती सर्व प्रक्रिया शासकीय यंत्रणात मार्फत बँकेमार्फत पारदर्शकपणे पडल्याचे सिद्ध झाले. त्यांनी सूचनापत्राद्वारे या सर्व तक्रार कर्त्यांना  आपल्या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही त्यांची माथी भडकवून त्यांना संविधान चौकात बसविण्यात आले आहे.

अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा असल्याने व मागील काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपले नाव आल्याने  विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या बदनामीचे कट कारस्थान सुरू केलेले आहे. जिल्ह्यात आपल्या विरोधात तक्रार करणाऱ्याना हाताशी धरून त्यांची डोके भडकावून त्यांना पूर्ण आर्थिक सहयोग करून अधिवेशनापूर्वी नागपूर येथील संविधान चौकामध्ये माझ्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसविले आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेला हे सत्य माहीत आहे. परंतु आपले वारंवार होणारी बदनामी आपण सहन करणार नसून यापुढेही अशी बदनामी सुरू राहिल्यास जो आपली बदनाम करेल त्याला त्याच प्रकारे उत्तर दिले जाईल असा इशारा या माध्यमातून आ. डॉ. देवराव होळी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments