Ideas

काटलीची शाळा पाहून भाई जयंत पाटील भारावले : दिला एक लाख रुपयांचा निधी



गडचिरोली : २६ व २७ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले पक्षाचे सरचिटणीस तथा विधिमंडळाचे जेष्ठ सदस्य आमदार भाई जयंत पाटील यांनी काटली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, शिस्त, स्वच्छता यासह नीटनेटकी व्यवस्था पाहून ते भारावले आणि लगेच शाळेत अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी शाळेला एक लक्ष रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. 


भाई जयंत पाटलांच्या आगमनानिमित्त काटली आणि परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी आपली कैफियत ऐकून घेण्याची विनंती केली होती. आ.पाटील यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून आणि समजून घेतले. शेतकऱ्यांच्या विम्याची समस्या आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या शेतांचे चुकीचे पंचनामे, त्यामुळे कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. यावर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, शेकापचे काटली येथील कार्यकर्ते देवेंद्र भोयर, रेवनाथ मेश्राम, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश ऊंदीरवाडे, वामन साखरे, सेवा निवृत्त तहसीलदार खंडारे, प्रभाकर डोईजड, परशुराम मुनघाटे,नरेश कोहपरे, श्रीकांत मुनघाटे, कैलास शिंपी, जिप प्राथमिक शाळा काटलीच्या मुख्याध्यापक आकरे व त्यांचे सहकारी आणि गावातील नागरिक, शेतकरी बंधू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments