बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग
गडचिरोली : शहरातील प्रभाग क्रमांक ०२, लांझेडा वार्ड येथील हनुमान मंदिर सभागृहात सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि भारतीय संन्यासी, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. थोर महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला लांझेडा वार्डातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेविका कोमल छत्रपती नैताम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समाजविचारक, बजरंग दलाचे कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक गणेश नैताम हे विशेष उपस्थित होते.
कार्यक्रमात युवक व सामाजिक कार्यकर्त्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. यामध्ये निलेश सोमनकर, रोशन नैताम, सुनिल नैताम, छत्रपती नैताम, लॅक्की भांडेकर, सुरज वैरागडे, प्रशांत मेश्राम, रितिक भांडेकर, सागर चापले, अमोल नैताम आदींचा समावेश होता. तसेच ज्येष्ठ नागरिक श्री. बालाजी भांडेकर आणि गुरुदेव सेवा मंडळ (लांझेडा शाखा) चे अध्यक्ष श्री. शामरावजी नैताम यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वार्डातील बालगोपाळ व युवा पिढीचा उत्स्फूर्त सहभाग. अनेक चिमुकल्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून राजमाता जिजाऊंचा पराक्रम, त्याग व दूरदृष्टी मांडली, तर स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास आणि युवकांना दिशा देणाऱ्या विचारांचे प्रभावी सादरीकरण केले. थोर महापुरुषांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश यशस्वीरीत्या साध्य झाल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी चिमुकल्यांना पेन व चॉकलेटचे वाटप करून त्यांचे कौतुक करण्यात आले, ज्यामुळे बालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लांझेडा वार्डातील नागरिक, युवक व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे समाजात संस्कार, इतिहासाची जाणीव आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत होत असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.


0 Comments