Ideas

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बाईक रॅली व कठाणी नदीची स्वच्छता

गडचिरोली ५ :
दरवर्षी ५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आज दिनांक ५ जून २०२३ रोजी वनपरीक्षेत्र कार्यालय गडचिरोली (प्रादेशिक) व वनपरीक्षेत्र कार्यालय सामाजिक वनिकरण, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बाईक रॅली व कठाणी नदी परिसर स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला.

गडचिरोली सामाजिक वनिकरण, प्रादेशिक विभाग, ग्रीन्स संस्था व पीपल्स फॉर एन्वीरॉनमेंट ॲंड ॲनिमल वेलफेअर संस्था यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. 
या कार्यक्रमात गडचिरोली परीक्षेत्र कार्यालयापासून ते बस स्टॅण्ड, गांधी चौक मार्गे कठाणी नदीपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली आणि पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. गडचिरोलीचे मानद वन्यजीव रक्षक श्री. मिलिंद उमरे यांनी कठाणी नदी परिसरातील पक्षांची ओळख करून दिली व स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह ग्रींन्स संस्थेच्या अध्यक्षा अंजली कुळमेथे व पीपल्स फॉर एन्वीरॉनमेंट ॲंड ॲनिमल वेलफेअरचे अजय कुकुडकर यांनीही स्वच्छता मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदविला.
प्लास्टिकचे नैसर्गिकरीत्या विघटन होत नसल्याने ते नदी नाल्यांमधे वाहत जाऊन प्रदूषण वाढते. असा कचरा पाळीव तथा वन्यप्राणी खातात आणि पोटाच्या विकारांनी मरण पावतात.
कठाणी नदी परिसरात स्मशानभूमी असल्याने तेथील उरलेला कचरा नागरिक नदीमध्ये फेकून देतात त्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. सबब नदीतील कचरा, प्लास्टिक, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, काचसामन, कपडे, इ. गोळा करून नगरपालिकेच्या घंटागाडीमधे भरून खरपुंडी येथील कचरा व्यवस्थापन यार्ड मध्ये प्रक्रिया करण्यासाठी देण्यात आला.


नदी नाले प्रदूषित झाल्याने नदीतील जलचर मरतात आणि पिण्याचे पाणी दूषित होऊन रोगराई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीनाल्यांमध्ये कचरा करू नये आणि आपले तसेच पुढील पिढीचे आरोग्य धोक्यात येईल अशी कृती टाळावी असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी केले.
प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यायी वस्तूंचा वापर करावा. प्रदूषण कमी होण्यासाठी पर्यावरण पुरक वाहनांचा जसे सायकल, ई-स्कूटर इ. चा वापर करावा आणि वृक्षारोपण करून ते वृक्ष जगविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन गडचिरोली वनविभागाचे उप वनसंरक्षक श्री. मिलिशदत्त शर्मा यांनी केले.

या कार्यक्रमासाठी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयातील वनपाल श्री. नवघरे, श्री. जनबंधू, श्री. वासेकर, श्री. नंदेश्वर तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. सामाजिक वनिकरण परीक्षेत्रातील वनपाल श्री. नीलकंठ वासेकर, विद्या उइके, कु. खुलसंगे, मनोज पिपरे तसेच इतर कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक श्री. सोनल भडके यांच्या मार्गदर्शनामध्ये गडचिरोली वनपरिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. धीरज ढेंबरे यांनी केले होते. कार्यक्रमात सहभागी अधिकारी, कर्मचारी व इतरांना चहापाणाची सोय वनरक्षक बि. पि. राठोड यांनी केली.

Post a Comment

0 Comments