Ideas

कोनसरीमधील प्रकल्पग्रस्त व बेरोजगारांना तसेच लोहप्रकल्पाला परिसरातील ग्रामपंचायतीने सहकार्य करावे




कोनसरी ग्रामपंचायतीने घेतला ठराव

चामोर्शी, २८ मे :- गावात लोह प्रकल्प झाल्यास गावातील युवकांना रोजगार मिळेल या उद्देशाने कोनसरी येथील शेतकऱ्यांनी केवळ पाच लाख रुपये दराने प्रकल्पाला जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रकल्पाचे काम सुरू आहे. ज्यांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या त्यापैकी अनेकांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. अशा स्थितीत जिल्ह्यातील युवकांचा विचार करून प्रकल्पाला विरोध केला जात आहे. प्रकल्प रेंगाळल्यास भूमिहीन झालेल्या नागरिकांचे हाल होतील. त्यामुळे कोनसरीमधील प्रकल्पग्रस्त व बेरोजगारांना तसेच लोहप्रकल्पाला परिसरातील ग्रामपंचायतीने सहकार्य करावे, असा ठराव कोनसरी ग्रामपंचायतीने घेतला आहे.


ग्रामपंचायतीच्या ठरावात म्हटले आहे की, ज्यावेळी लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला प्रकल्पासाठी जागा हवी होती, त्यावेळी आजूबाजूच्या गावांनी जमिनीचे दर दहा ते पंधरा लाख रुपये एकर एवढे सांगितले. हा प्रकल्प इतरत्र जाऊ नये यासाठीकोनसरी गावातील शेतकऱ्यांनी कंपनीने बोललेल्या रेटप्रमाणे म्हणजेच पाच लाख रुपये प्रतिएकर या दरात कंपनीला जमिनी दिल्या. तेव्हा कुठे हा प्रकल्प कोनसरी गावात उभा राहिला. प्रकल्पाचे काम सुरू आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के भूमीधारक शेतकरी व गावातील बेरोजगार यांना रोजगार प्राप्त झाला आहे. कंपनीचे एकही युनिट सुरू झालेले नाही. गावातील प्रकल्पग्रस्त बेरोजगार रोजगार मिळेल, या आशेने वाट पाहत असताना परिसरातील इतर ग्रामपंचायतींनी कंपनीविरोधात आताच मोर्चे काढणे योग्य नाही.

इतर गावांमधील बेरोजगारांना प्रकल्पात रोजगार मिळावा यासाठी ग्रामपंचायतीचे कुठलेही बंधन घातलेले नाही. मात्र, प्रकल्पाचे काम होऊ द्या. आमच्या गावातील नागरिकांच्या जमिनी गेल्या असल्याने ते भूमिहीन झाले आहेत. रोजगाराचा पहिला हक्क त्यांचा आहे. प्रकल्प रखडल्यास रोजगार व जमीनही जाईल. प्रकल्पासाठी कोनसरी येथील नागरिकांच्या जमिनी गेल्या आहेत. गावातील अनेक कुटुंब भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे रोजगारावर पहिला हक्क या कुटुंबांचा आहे. असे असताना काही राजकीय व्यक्ती स्थानिकांना रोजगारासाठी प्रकल्प बंद पाडण्याची धमकी देत आहेत. प्रकल्प थांबल्यास सर्वाधिक नुकसान ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे होईल. त्यांची जमीन व रोजगारही जाईल, असे ठरावात म्हटले आहे.

कोनसरी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, ग्रा. पं. सदस्य गीता गड्डे, सुनीता कोवे, राकेश दंडिकवार, विजय सिडाम, सविता आत्राम, वैशाली करपते, ललिता मोहुर्ले यांनी ठराव मांडला आहे. याला कोनसरी येथील गावकऱ्यांनीही पाठबळ दिले आहे.

Post a Comment

0 Comments