Ideas

दारू तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम

 

दारू तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बैठक संपन्न  


गडचिरोली :- दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यकम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची, जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ ते १ वाजता दरम्यान बैठक संपन्न झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, मुक्तिपथ जिल्हा समितीचे सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूढे मुक्तिपथचे नव्याने रुजू झालेले संचालक तपोजेय मुखर्जी, उपसंचालक संतोष सावळकर, इत्यादी प्रमुख अधिकारी बैठकीला हजर होते.

यावेळी डॉ. अनिल रूढे यांनी मागील झालेल्या बैठकीचा कार्यवृतांत व अनुपालन अहवाल याचे वाचन केले व मांडणी केली तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण गडचिरोली जिल्हा टीम अंतर्गत केलेल्या कृतीची मांडणी केली. मुक्तिपथचे संचालक तपोजेय मुखर्जी व संतोष सावळकर यांनी मुक्तिपथ अभियान (दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम) याबाबत रूपरेखा व झालेल्या कामाच्या माहितीचे सादरीकरण केले. मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी याअगोदर दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृतांताचा आढावा घेत, विविध नवीन कृती करण्याबाबत संबधित विभागांना सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.

यामध्ये मुख्यत: गडचिरोली शहरात व जिल्ह्यात इतरही तालुक्यात कायद्याने बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा वापर, खर्रा वापराचे प्रमाण खूप जास्त वाढले असून त्यावरील कार्यवाही साठी असलेल्या जिल्हा स्तरीय पथकाने सक्रीय होऊन त्वरित कृती करावी. आवश्यक ठिकाणी COTPA कायद्याचा वापर करून दंड करावे. अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी यासाठी विशेष कृतीचे नियोजन करून पथकामधे सहभागी होऊन कृती करावी. प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, इतर कर्मचारी यांनी तंबाखूमुक्त शाळा व परिसर निर्माण करावा. परिपाठ व इतर कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व संपूर्ण शाळा परिसर तंबाखूमुक्त करावा. मुक्तिपथ अंतर्गत तयार केलेल्या कायदा पुस्तिकेचे सर्व ग्रामपंचायत द्वारा गावात चावडी वाचन करून दारू व तंबाखू विरोधी कायद्या बाबत जाणीवजागृती करावी. सर्व सरकारी कार्यालये व परिसर तंबाखूमुक्त असावे यासाठी संबधित विभाग प्रमुखाने नियोजन करून कार्यवाही करावी. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयापासून 100 यार्ड अंतराच्या आत तंबाखू विक्रीला बंदी आहे, याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. अवैध दारुविक्री बंदी बाबत अंमलबजावणी कडकपणाने करणे आवश्यक असल्याचे सांगून, याबाबत अधिकाधिक जणांवर पोलीस विभागांद्वारा कारवाई करावी. मुक्तिपथ ग्रा.प. समिती अधिक सक्रीय करून त्या द्वारे अवैध दारू व तंबाखू नियंत्रण साठी समितीने कृती करावी. अशा सूचना मा. अतिरक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिल्या. डॉ. अनिल रूढे यांनी सर्वांचे आभार मानत, जिल्हाधिकारी यांचे परवानगीने बैठकीची सांगता केली. या बैठकीला, अन्न औषध विभागाचे प्रतिनिधी श्री. सुरेश तोरेम, मुक्तिपथचे कमलकिशोर खोब्रागडे, डॉ. दिनेश रोकडे जिल्हा समन्वयक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मीना दिवटे, राहुल कंकनालवार, दिनेश खोरगडे, राहुल चावरे तसेच, पोलीस विभाग, आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिती अधिकारी, इत्यादी विविध विभागाचे प्रमुख आजच्या बैठकीला हजर होते.






Post a Comment

0 Comments